Ad will apear here
Next
येडी बाभळ
ती बाभळ पांडबाच्या आयुष्यात कधी आली ते त्याला नेमकं सांगता येणार नाही.
पांडबाच्या घरापुढची ती बाभळ कधी उगवली ते कुणाला समजलं नाही. पण तिची कुणाला अडचणही नव्हती. बारीक असताना ती वासरं बांधायच्या कामाची होती आणि मोठी झाल्यावर एक-दोन जनावरापुरती सावली देऊ लागली. पांडबाच्या घरापुढं दुसरं कुठलं झाडही नव्हतं मग ती बाभळच पांडबाच्या घरापुढची सावली बनली.
'अहो ऐकलं का?' गजरीने पांडबाला आवाज दिला.
'नाय, कान बंद करून बसलोय!' पांडबा बायकोशी सरळ बोलत नसे.
'मला रयवारी माहेरची साडी पिच्चर बघायचाय!'
हातातला घास तसाच हातात धरून पांडबा गजरीकडं बघू लागला.
'तब्येत बरीहे ना?' आता तो घास बायकोच्या तोंडापुढे धरत पांडबा म्हणाला, 'खा!'
'काय लाडीगोडी लावू नका,' नवऱ्याचा हात झिडकारत गजरी म्हणाली. 'ह्या रयवारी मला माहेरची साडी दावला नाय तर मी माहेरच गाठीन!'
गजरी माहेरला जायची धमकी द्यायला लागल्यावर भाकर-तुकडा कोण घालणार? त्यापेक्षा तिला पिच्चर दाखवलेला बरा.
लग्नाला सहा-सात वर्ष झाली पण गजरीला अजून मूलबाळ नव्हतं. त्यात तिचा स्वभाव भांडकुदळ. एकत्र कुटुंबात धूसफूस करून तिने नवऱ्याला वेगळं घ्यायला लावलं. पांडबाच्या सख्ख्या भावाचं घर शेजारच्या वावरात होतं पण त्यांचं एकमेकांकडे येणं-जाणं नव्हतं. आता पांडबाला गजरी आणि गजरीला पांडबा असं छोटंसं जग होतं. ते दोघेही एकमेकांच्या विचाराने चालत.
पांडबा राहायचा तो मळा कष्टकऱ्यांची वस्ती. तिथं सगळा शेतकरी वर्ग. मळ्यात मोजून आठ-दहा घरं होती. ती सुध्दा तुटक तुटक. नदीवरून लिफ्टाने पाणी आणल्याने प्रत्येकाच्या दारात पाणी होतं. कामाने व्यापलेल्या बायकांना एकमेकांच्या घरी जायला, बसायला, गप्पा कुटायला वेळ नसे.
बाकी किराणा, दळण, भाजीपाला आणण्याचं काम पुरुष मंडळींकडे. मळ्यातल्या पुरुषांना सामाजिक जीवन होतं. गावातल्या डेअरीवर त्यांची उठबस असे. तरकारी घेऊन खडकी, गुलटेकडीला जाणारीही मंडळी होती.
मळ्यातल्या बायकांना बाहेरचं जग तितकं माहीत नव्हतं. मळ्यातला एकमेव टीव्हीसुद्धा अलीकडेच आलेला. त्यावर सगळ्यांनी महाभारत बघितलं होतं. दूरदर्शनवरची एखाद-दुसरी मालिका तर सोडली तर मळ्यातल्या बहुतेक बायकांना पिच्चरची तितकी गोडी नव्हती.
रसिकतेच्या दृष्टीने विचार करता हे जीवन थोडंसं रुक्ष होतं.
मळ्यातल्या पुरूषांना पिच्चर माहीत नव्हते असं नव्हतं. तमाशाची आवड असणारे पुरुष दादा कोंडकेचे पिच्चर आवर्जून बघायचे. पण १९९१ साली विजय कोंडकेचा 'माहेरची साडी' आला आणि त्याने सगळ्या बायकांना थिएटरवर खेचलं. माहेरची साडी बघितला नाही अशी बाई शोधूनही सापडत नव्हती. मळ्यातल्या बहुतेक बायकांनी तो पिच्चर बघितलेला.
'माहेरच्या साडी'ची कीर्ती गजरीपर्यत केव्हाच पोचली होती. पण तिला पिच्चरचं कसलं कौतुक? पुढे हळूहळू मळ्यातल्या सगळ्याच बायकांनी तो पिच्चर पाहिला आणि मग गजरीलाही पिच्चर पहावासा वाटू लागला.
एक दिवस तिने नवऱ्याला छेडलं. पांडबाने 'कशाला ती रडारड बघायची?' म्हणून तिला गप्प केलं. मग गजरीही विषय विसरून गेली. पुढे बघता बघता 'माहेरच्या साडी'ने शंभर आठवडे पार केले. मराठीत सर्वात जास्त गाजलेला चित्रपट म्हणून त्याची चर्चा होऊ लागली. लकी प्रेक्षकाला 'साडीची' भेट मिळू लागली. गजरीने अजूनही तो पिच्चर बघितला नाही म्हणून मळ्यातल्या बायका तिला वेड्यात काढू लागल्या.
'नवरा कसा पिच्चर दावत नाय तेच बघते!' गजरीने पांडबाला माहेरी जायची धमकी दिली आणि पांडबा तयार झाला.
अखेर एकदाचा पिच्चरला जायचा रविवार उगवला. गजरीने दहा वाजेपर्यंत कामं उरकून घेतली व ती तयार झाली.
'अंगावर एवढं डाग कशासाठी घातल्यात? आपुन लग्नाला चाललोय का?' नाकात नथ, कानात कुडक्या, गळ्यात पाच तोळ्यांची मोहनमाळ आणि हातात बांगड्या घालून तयार झालेली गजरी बघून पांडबा वैतागला.
'पहिल्याच्यानी पिच्चरला चाललेय. अंगाव दोन डाग नको का?' गजरी उलटी नवऱ्यावर धावली.
'डाग चोरीला गेल्यावर कळंन तुला!' पांडबानी आवाज वाढवला.
'तुमच्यासारखा पुरुष बरोबर असल्याव कुणाची हिंमतहे अंगाला हात लावायची?' गजरीच्या प्रश्नाचं पांडबाकडं उत्तर नव्हतं.
'चल, बाई चल! व्हायचं आसंन ते होऊंदे.' पांडबाने एसटी स्टँडचा रस्ता धरला आणि वहाणा फराफरा ओढत गजरी त्याच्यामागे निघाली.
ज्या एसटीत बसून पांडबा, गजरी शिवाजीनगरला आले ती बऱ्यापैकी मोकळी होती. शिवाजीनगरला उतरताच पांडबा सावध झाला व बायकोची विशेष काळजी घेऊ लागला. त्याला जिकडे तिकडे 'खिसेकापू व पाकीटमारांपासून सावध रहा' अशी पाटी दिसू लागली. त्याची नजर आसपास भिरभिरू लागली.
साडेअकरा वाजले. बसने किंवा पायीदेखील थिएटरवर जाणं धोक्याचं होतं. दागिन्यांनी मढलेल्या बायकोला गर्दीत न्यायचं नाही म्हणून त्याने रिक्षा करून प्रभात गाठलं.
'कशाला मराया रिक्षा केली? गेलो असतो की चालत!' गजरीने बडबड सुरू केली व रिक्षावाला मधल्या आरशातून तिच्याकडे बघू लागला. पांडबा 'गजरी आपल्याशी बोलत नाही' अशा अविर्भावात बाहेर बघत राहिला.
जोडी प्रभातवर पोचली. थिएटरवर फारशी गर्दी नव्हती. पांडबाने तिकीटं काढली. पिच्चर सुरू व्हायला अजून अवकाश होता.
'वोऽ मला भूक लागली! चला, हाॅटेलात थोडा नाश्टा करू,' गजरीने नवऱ्याला ऑर्डर सोडली.
'पिच्चर चालू व्हायची वेळ झाली आन् तुला भूक लागली होय?' दर दोन मिनिटांनी बायकोच्या अंगावरचे दागिने मोजून बघणारा पांडबा बायकोवर चिडला. 'चल, आत गेल्यावर कायतरी खायला घेऊ.'
'आत जाऊन खायला हे काय हाॅटेलहे का?' गजरीने तिचं घोडं दामटलं. घाईगर्दीत थिएटरमध्ये शिरण्याऐवजी थोडा वेळ हॉटेलमध्ये घालवू आणि मग निवांत आत जाऊन बसू, अशा विचाराने पांडबा गजरीला घेऊन हॉटेलात गेला.
पांडबाने दोन राईस प्लेट मागवल्या. दुपारच्या जेवणाला नाश्टा म्हणणाऱ्या गजरीने जेवणावर उभा-आडवा हात मारला. तिने एक्स्ट्रा चपाती, एक्स्ट्रा भात, एक्स्ट्रा ताकही मागवलं. चांगली जोगवून सुस्तावलेली गजरी पांडबाबरोबर थिएटरवर परतली.
'मेल्यांनी किती अंधाय केलाय!' थिएटरमधील अंधारात चाचपडत शिरल्यावर गजरी फुसफुसू लागली आणि आसपासच्या प्रेक्षकांच्या माना तिच्याकडे वळल्या. तेवढ्यात टॉर्चवालाही तिथे धावत आला.
'पिक्चर सुरू होऊन पाऊन तास झाला!' तिकिटे तपासताना टाॅर्चवाला बडबडला. त्या दोघांना एका रांगेजवळ नेऊन त्याने १७-१८ नंबरच्या सीटवर टाॅर्चचा झोत टाकला.
उजव्या हाताच्या खुर्च्यांना हात लावत पांडबा पुढे सरकू लागला. त्या रांगेतले लोक आपले पाय आखडून घेऊ लागले.
'ई! काय मूर्ख बाई आहे? खुशाल पायावर पाय दिला!' अंधारात एक बाई विव्हळली.
'ए भवाने! मुर्ख कुणला म्हणती गं?' पायाने तुडवलेल्या बाईला गजरीने शब्दांनीही तुडवले. आसपासचे लोक 'श्शऽ श्शऽ' करू लागले.
कोण आपल्याला 'श्शऽ' करतंय? गजरी आसपास बघू लागली. पण अंधारात तिला काही समजलं नाही. प्रसंगावधान राखत पांडबाने बायकोचा हात पकडला व ओढतच तिला पुढे नेली.
'कुठून हे असले नमुने येतात?' गजरीने तुडवलेली बाई हळूच बोलली. तरीही गजरीला ते समजलं व ती त्या बाईकडे रागाने बघू लागली. शेवटी पांडबाने बायकोच्या हातावर हात ठेवून तिला शांत केलं.
पांडबाला त्या रडक्या पिच्चरमध्ये रस नव्हता. विजय चव्हान, राघवेंद्र कडकोळच्या विनोदाचं त्याला हसू येत होतं.
खुर्चीत स्थिरावल्यावर गजरी विचार करू लागली. ती पडदा सोडून सगळीकडं बघत होती. कुठं प्रोजेक्टर, कुठं पडदा, कुठं दरवाजे, कुठं बाल्कनी, कुठं प्रेक्षक! सगळं समजून घेण्यात पंधरा-वीस मिनिटं गेली. थोडीशी भानावर आल्यावर ती पिच्चर बघू लागली पण तिला कथा समजेना. भरपूर खाऊन आल्याने सुस्तीही येऊ लागली. पिच्चर चालू असताना मध्ये मध्ये बायका उसासे का टाकताहेत तेही तिला समजत नव्हतं.
अलका कुबलचं लग्न ठरलं तेव्हा वातानुकूलित थिएटरमधील थंडगार हवेत पुढच्या खुर्चीखाली पाय लांबवून गजरी गाढ झोपली होती.
मध्यांतराची घंटा झाली आणि थिएटरात उजेड झाला. पांडबाने पाय ताणून झोपलेल्या गजरीला उठवायचा प्रयत्न केला नाही. दिव्यांच्या उजेडात त्याने बायकोच्या अंगावरचे सगळे दागिने जागेवर असल्याची खात्री केली. त्यांच्या आसपासच्या खुर्च्या मोकळ्या होत्या. तीही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरली. चित्रपट संपेपर्यंत जागा सोडायची नाही असं पांडबाने ठरवून टाकलं.
माहेरची साडी मध्यांतरानंतर जास्तच भावनिक होऊ लागला. तिरस्कार करणारा बाप, रागराग करणारी सावत्र आई व छळ करणाऱ्या सासूमुळे रड रड रडणाऱ्या सूनेचे हाल बघवत नव्हते. बायकांच्या तोंडून हुंदके बाहेर पडत होते, कुणी नाक पुसत होतं तर कुणी डोळ्यांना रुमाल लावत होतं.
'घर्रऽघर्रऽ घर्रऽघर्रऽ' थिएटरमध्ये घरघर ऐकू येऊ लागली. डोळ्यांतले अश्रू पुसत बायका आसपास बघू लागल्या. शेवटी आवाजाचा उगम सापडला. खुर्चीत डाराडूर झोपलेली गजरी मोठ्याने घोरत होती.
पांडबाने दोन-तीन वेळा बायकोला उठवायचा प्रयत्न केला होता पण ती उठली नाही. आसपासचे प्रेक्षक पांडबाकडे रागाने बघू लागल्यावर त्याने गजरीचा खांदा धरून तिला जोरात हलवलं.
'गप्प बसा की! आता कुठं झोप लागली तर लागले अंगाला झोंबायला!' गजरी झोपेत बोलली. गाढ झोपेत गजरी काय आचरट बडबड करते ते पांडबालाच ठावूक. गजरीची 'तसली बडबड ऐकण्याऐवजी तिचं घोरणं बरं' म्हणून पांडबा तिथून उठून चार रांगा मागे जाऊन बसला.
पांडबाचं आणि थिएटरवाल्याचंही नशीबच म्हणायचं की पिच्चर संपला आणि गजरी जागी झाली. पांडबा तिच्या शेजारच्या खुर्चीवर येऊन बसला. गजरीच्या आसपास बसलेले प्रेक्षक वगळता सगळं थिएटर अश्रूंत भिजलं होतं. बायका उसासे टाकत होत्या, पदराने डोळे पुसत होत्या, अलका कुबलच्या सासूला शिव्या घालत होत्या.
'संपला व्हय पिक्चर?' थिएटरमधले दिवे चालू होताच जवळ येऊन बसलेल्या नवऱ्याला गजरीने विचारलं.
'हा संपला एकदाचा!' पांडबा म्हणाला.
'चला निघू.'
'थांब जरा, गर्दी जाऊ दे.'
दागिने घातलेल्या बायकोला गर्दीत न्यायची नाही म्हणून पांडबा खुर्चीत मागे रेलून बसला व त्याने डोळे झाकले.
पांडबाला पुढच्या काही क्षणातच गजरीने उसासे टाकल्याचा भास झाला. मग तिच्या हुंदक्यांचाही आवाज येऊ लागला. गजरीने पिच्चरचा शेवट बघितला असावा असं समजून पांडबा डोळे मिटून तसाच पडून राहिला.
'बया गंऽ' गजरी मोठ्याने ओरडली तसा पांडबा दचकला व डोळे उघडून खुर्चीत सरळ बसला.
'कुणी मेल्याने डाव केला गंऽ माझ्या गळ्यातलं पळवलं गंऽ मेल्याचं वाटोळं होईल गंऽ' दोन्ही हात छातीवर आपटीत गजरी ऊर बडवून घेत होती.
सगळ्या चित्रपटभर रडलेले प्रेक्षक आता कुठे रूमाल खिशात ठेवतात तर 'हे कोण रडतंय?' म्हणून इकडे तिकडे बघू लागले. दरवाजापर्यंत गेलेले काही प्रेक्षक माघारी फिरले व हॉलमध्ये बसून रडणाऱ्या गजरीकडे बघू लागले.
'आसंच होतं हा पिक्चर बघताना! मी 'माहेरची साडी' दहा वेळा बघितलाय!' गजरीच्या रडण्याचं कारण न समजलेली एक बाई म्हणाली.
'तसं नाही हो... तिचे दागिने चोरीला गेलेत!' दुसरी बाई म्हणाली.
दागिने चोरी गेल्याचं समजताच संपूर्ण थिएटरमध्ये गडबड झाली. थिएटर चालकांनी पोलिस बोलावले, प्रेक्षकांची तपासणी झाली पण दागिनेचोर कधीच निसटून गेला होता.
'दागिने गेले तर जाऊ दे. आधी तुझं बोंबलणं बंद कर!' पांडबा ओरडू ओरडू गजरीला सांगत होता पण गजरीचा गजर चालूच राहीला.
थिएटरमधून बाहेर पडल्यापासून घरी येईपर्यंत गजरीचं तोंड चालू होतं. तिची मोहनमाळ व मंगळसूत्र चोरीला गेल्याची खबर सगळ्या मळ्यात झाली. बायकांनी घरी येऊन गजरीला सहानुभूती दाखवली. त्या रात्री नवरा-बायको उपाशी राहिले. गजरी खूप उशीरापर्यंत शिव्याशाप देत राहिल्याने पांडबालाही झोपायला उशीर झाला.
तो सकाळी उठला तेव्हाही गजरीचा तोंडपट्टा चालूच. त्याने चुलीतली राख घेतली व बाहेर बाभळीखाली जाऊन उभा राहिला.
'मी एवढं राबून, पैशे साचवून घेतल्यालं डाग चोरताना त्याला लाज कशी वाटली नाय? त्यो बांडगूळ जिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालीन तिचा नवरा मरन, ज्या अवदसंला ती मोहनमाळ देईन तिचं घर बसंन...' घरात गजरी चोराला शिव्या घालत होती तर बाहेर कोवळ्या उन्हात उभा पांडबा राखेने दात घासत होता.
'तू पहिलं रडायचं बंद कर. आपण दागिनं परत करू...' पांडबाने बायकोला समजावण्याचा प्रयत्न केला.
'आग लागली त्या माहेरच्या साडीला!' गजरीने आता पिच्चरला शिव्या घालायला सुरूवात केली. 'मेल्यांनी कसला पिच्चर बनवलाय? माझं डाग गेलं ना! मुडदा पडला त्या पिच्चरवाल्यांचा...' गजरी ऐकायच्या मनस्थितीत नव्हती.
बाहेरच्या रांजणातून तांब्याभर पाणी देऊन पांडबाने चूळ भरली. घरात जाऊन तरी काय करायचं म्हणून तो अंगणातल्या बाभळीकडे बघत उभा राहिला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZTTDI
Similar Posts
येडी बाभळ ती बाभळ पांडबाच्या आयुष्यात कधी आली ते त्याला नेमकं सांगता येणार नाही. पांडबाच्या घरापुढची ती बाभळ कधी उगवली ते कुणाला समजलं नाही.
येडी बाभळ ती बाभळ पांडबाच्या आयुष्यात कधी आली ते त्याला नेमकं सांगता येणार नाही. पांडबाच्या घरापुढची ती बाभळ कधी उगवली ते कुणाला समजलं नाही. पण तिची कुणाला अडचणही नव्हती. बारीक असताना ती वासरं बांधायच्या कामाची होती आणि मोठी झाल्यावर एक-दोन जनावरापुरती सावली देऊ लागली. पांडबाच्या घरापुढं दुसरं कुठलं झाडही नव्हतं मग ती बाभळच पांडबाच्या घरापुढची सावली बनली
येडी बाभळ ती बाभळ पांडबाच्या आयुष्यात कधी आली ते त्याला नेमकं सांगता येणार नाही.
येडी बाभळ ती बाभळ पांडबाच्या आयुष्यात कधी आली ते त्याला नेमकं सांगता येणार नाही. पांडबाच्या घरापुढची ती बाभळ कधी उगवली ते कुणाला समजलं नाही. पण तिची कुणाला अडचणही नव्हती. बारीक असताना ती वासरं बांधायच्या कामाची होती आणि मोठी झाल्यावर एक-दोन जनावरापुरती सावली देऊ लागली. पांडबाच्या घरापुढं दुसरं कुठलं झाडही नव्हतं मग ती बाभळच पांडबाच्या घरापुढची सावली बनली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language